अनुचित सामग्रीचा उपभोग घेणे ही केवळ शारीरिक ओढ नसून त्यामागे मानवी मेंदूचे जटिल न्यूरोसायन्स आणि खोलवर रुजलेली मानसिक कारणे आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्म्स या मानसशास्त्रीय कमतरतांचा फायदा घेऊन वापरकर्त्याला या जाळ्यात अडकवतात. उपभोगण्याच्या या मानसशास्त्राचे विविध पैलू समजून घेतले तर पालक आणि शिक्षक मिळून नव्या पिढीला उचित मार्गदर्शन देऊ शकतील.
९.१ डोपामाइनचा परिणाम: व्यसनाचे न्यूरोसायन्स
जेव्हा एखादी व्यक्ती अनुचित सामग्री पाहते, तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होते. डोपामाइन हे आनंदाचा आणि बक्षीस मिळाल्याचा आभास निर्माण करणारे रसायन आहे. नैसर्गिक प्रक्रियेपेक्षा अनुचित साहित्यामुळे हे उत्सर्जन अत्यंत वेगवान आणि तीव्र असते. जेव्हा मेंदूला वारंवार अशा कृत्रिम उत्तेजनाची सवय होते, तेव्हा तो सामान्य जीवनातील छोट्या आनंदांकडे दुर्लक्ष करू लागतो. यालाच रतिचित्रणाचेचे व्यसन म्हणतात. हे व्यसन अंमली पदार्थांच्या व्यसनासारखेच मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणते. वापरकर्त्याला पुन्हा तोच उच्च दर्जाचा आनंद मिळवण्यासाठी वारंवार आणि अधिक वेळ अशा सामग्रीकडे वळावे लागते, ज्यातून बाहेर पडणे वैयक्तिक इच्छाशक्तीच्या पलीकडे जाते.[1]
९.२ असंवेदनशीलता: टोकाच्या सामग्रीची गरज
सतत अनुचित साहित्य पाहिल्यामुळे मेंदूची संवेदनशीलता कमी होत जाते, ज्याला मेडिकल भाषेत टॉलरन्स असे म्हणतात. सुरुवातीला जी सामग्री उत्तेजित करणारी वाटायची, ती काही काळानंतर सामान्य वाटू लागते. त्यामुळे पूर्वीसारखाच आनंद मिळवण्यासाठी वापरकर्ता अधिक प्रक्षोभक, हिंसक किंवा विकृत सामग्री शोधू लागतो. या प्रक्रियेला एस्केलेशन म्हणतात. साध्या अश्लीलतेकडून टोकाच्या विकृतीकडे जाण्याचा हा प्रवास केवळ मेंदूच्या असंवेदनशीलतेमुळे होतो.[2] यामुळे वापरकर्त्याची वास्तवातील लैंगिक समज बिघडते आणि त्याला सामान्य मानवी नातेसंबंध कंटाळवाणे वाटू लागतात. ही असंवेदनशीलता व्यक्तीला अशा थराला नेते जिथे ती नैतिक आणि कायदेशीर मर्यादांचे भान विसरून बसते.
९.३ इतरांचे खाजगी आयुष्य बघण्याची उर्मी: वॉयरिझम
मानवी स्वभावात इतरांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची एक सुप्त इच्छा असते, ज्याला मानसशास्त्रानुसार वॉयरिझम (Voyeurism) म्हटले जाते. [3] डिजिटल युगात लपून कॅमेऱ्याने घेतलेले व्हिडिओ किंवा एखाद्याचे खाजगी क्षण पाहण्याची उर्मी या भावनेचा फायदा घेते. वापरकर्त्याला वाटते की तो कोणाच्यातरी खाजगी आयुष्याचा भाग बनत आहे, जो वास्तविक जीवनात शक्य नसते. ही उर्मी व्यक्तीला निनावीपणाच्या जोरावर इतरांच्या गोपनीयतेचा भंग करण्यास प्रवृत्त करते. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेला हा आभासी प्रवेश वापरकर्त्याला एका वेगळ्याच सत्तेचा आणि आनंदाचा अनुभव देतो. ही प्रवृत्ती केवळ अश्लीलतेपुरती मर्यादित नसून, ती दुसऱ्याच्या लज्जेचा आनंद घेण्यापर्यंत विस्तारते, जी एक मानसिक विकृती आहे.
९.४ पलायनवाद विरुद्ध वास्तव: तणावाचा सामना
अनेक लोक दैनंदिन जीवनातील तणाव, नैराश्य किंवा अपयशापासून पळ काढण्यासाठी अनुचित सामग्रीचा वापर करतात. जेव्हा वास्तवातील संकटे पेलणे कठीण होते, तेव्हा डिजिटल जगातील हे कृत्रिम सुख त्यांना एक तात्पुरता आधार वाटते. याला पलायनवाद (Escapism) म्हणतात.[4] रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा एकटेपणा घालवण्यासाठी अनुचितपणाचा वापर करणे हे एक स्व-विनाशकारी धोरण आहे. यामुळे समस्या सुटण्याऐवजी वापरकर्ता त्या दलदलीत अधिक खोलवर रुतत जातो. वास्तवाचा सामना करण्याऐवजी आभासी सुखात रमल्यामुळे व्यक्तीची निर्णयक्षमता आणि मानसिक धैर्य कमी होते. हे पलायनवाद त्याला वास्तवातील जबाबदाऱ्यांपासून दूर नेतो, ज्यामुळे त्याचे सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्य विस्कळीत होते.
९.५ एकाकीपणाचा परिणाम: मानवी संवादाची जागा
आधुनिक जीवनातील वाढता एकाकीपणा लोकांना डिजिटल उपभोग घेण्यास प्रवृत्त करत आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला समाजात किंवा कुटुंबात पुरेसा संवाद मिळत नाही, तेव्हा ती इंटरनेटवर आभासी नाती शोधू लागते. अनुचित सामग्री पाहताना निर्माण होणारी जवळीक ही प्रत्यक्षात एकाकीपणावरची तात्पुरती मलमपट्टी असते. मात्र, हा डिजिटल उपभोग वास्तवातील मानवी संवादाची जागा कधीच घेऊ शकत नाही. उलट, यामुळे वापरकर्ता अधिक अंतर्मुख आणि सामाजिकदृष्ट्या अकार्यक्षम बनतो. तो लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याऐवजी पडद्यावरच्या पात्रांशी भावनिकरित्या जोडला जातो. हे चक्र व्यक्तीला समाजापासून तोडते आणि तिला अशा एकाकी विश्वात ढकलते जिथे केवळ अनुचितपणा हाच एकमेव सोबती उरतो.
[1] Todd Love, Christian Laier, Matthias Brand, Linda Hatch, and Raju Hajela, “Neuroscience of Internet Pornography Addiction: A Review and Update”, Behav. Sci. 2015, 5, 388-433
[2] NeuroLaunch editorial team, “Obscene Behavior: Legal, Social, and Psychological Implications”, NeuroLaunch, Dt. 22.9.2022, available at: https://neurolaunch.com/obscene-behavior/, last visited on 9.12.2025
[3] Dr Neeshu Rathore, “Exploring the Depths of Voyeurism: A Psychological Perspective”, Psywellpath, Dt. 7.4.2025, available at: https://glossary.psywellpath.com/the-psychology-of-voyeurism, last visited on 9.12.2025
[4] Rahul Yadav “Gratification in the Digital Age: The Rise of Instant Gratification and Its Consequences”, Buzzpeak, Dt. 10.3.2025, available at: https://buzzpeakblog.wordpress.com/2025/03/10/gratification-in-the-digital-age-the-rise-of-instant-gratification-and-its-consequences/, last visited on 9.12.2025

Instead of doom-scrolling on mobile, just start reading good books. You can opt an option of e-books to save paper.
