१०. वैयक्तिक परिणाम – पुरुष आणि स्त्रिया

इंटरनेटवरील अनुचित साहित्याचा (रातिचित्रण) मानवी जीवनावर होणारा परिणाम हा आजच्या काळातील एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक विषय आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हे साहित्य सहज उपलब्ध झाले आहे, परंतु त्याचे मानसिक, सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर होणारे दुष्परिणाम खोलवर परिणाम करणारे आहेत. अनुचित साहित्यामुळे केवळ व्यक्तीचे लैंगिक आयुष्यच बाधित होत नाही, तर तिच्या वैयक्तिक आणि मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतात. या विषयातील विविध मुद्द्यांचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे.

१०.१ विकृत दृष्टिकोन: पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन

अनुचित साहित्याचा सर्वाधिक घातक परिणाम म्हणजे पुरुषांच्या मानसिकतेत होणारा बदल. अशा साहित्यात प्रणयक्रीडेचे अत्यंत अवास्तव आणि अनेकदा हिंसक चित्रण केले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार हे साहित्य पाहते, तेव्हा तिच्या मनात स्त्रियांबद्दलचा आदर कमी होऊन एक विकृत प्रतिमा तयार होऊ लागते. खऱ्या आयुष्यातील नातेसंबंध आणि पडद्यावर दिसणारे कृत्रिम जग यातील फरक ती व्यक्ती विसरून जाते. [1]

यामुळे पुरुषांच्या मनात असा समज निर्माण होतो की स्त्रिया केवळ पुरुषांच्या उपभोगासाठी आहेत आणि प्रत्येक स्त्री याच्यासाठी कायम तयारच असते. स्त्रियांच्या भावना, त्यांची संमती आणि त्यांचे स्वातंत्र्य यांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते, कारण स्त्रीच्या नकारातच तिचा होकार आहे असे भ्रम अशा अनुचित साहित्यात निर्माण केलेले असते. अनुचित साहित्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या आक्रमक कृतींना पुरुष सामान्य समजू लागतात, ज्यामुळे खऱ्या आयुष्यातही त्यांच्या वर्तनात उद्धटपणा किंवा विकृती येऊ शकते. हा दृष्टिकोन निकोप सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे, कारण यामुळे परस्पर आदरावर आधारित असलेल्या नातेसंबंधांचा पाया कमकुवत होतो.

१०.२ शरीर रचनेबद्दल न्यूनगंड: स्त्रियांवर अवास्तव मानकांचा प्रभाव

अनुचित साहित्यात कलाकारांची शरीरे विशिष्ट पद्धतीने, मेकअप आणि तांत्रिक एडिटिंगचा वापर करून सादर केली जातात. शरीराच्या काही भागांचे प्रदर्शन करून त्या अंगाला तसेच असायला पाहिजे असे वारंवार दाखवून एक अवास्तव मानक स्त्रिया आणि विशेषत: मुलींवर थोपले जाते. हे पाहून सामान्य मुली आणि स्त्रियांच्या मनात स्वतःच्या शरीर रचनेबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. त्यांना वाटते की त्यांचे शरीर त्या पडद्यावरील पात्रांसारखे परिपूर्ण नाही. अवास्तव सौंदर्याच्या आणि शरीरयष्टीच्या मानकांमुळे मुली आणि स्त्रियांना स्वतःबद्दल असुरक्षित वाटू लागते. [2]

हा न्यूनगंड केवळ मानसिक त्रासापुरता मर्यादित राहत नाही, तर तो खाण्यापिण्याच्या सवयींमधील बदल (इटिंग डिसऑर्डर) किंवा अनावश्यक कॉस्मेटिक सर्जरीच्या आकर्षणापर्यंत जाऊ शकतो. मुली आणि स्त्रियांना सतत असे वाटते की त्या पुरेशा सुंदर किंवा आकर्षक नाहीत, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खालावतो. या साहित्यामुळे समाजाची सौंदर्याची व्याख्या बदलली आहे, जी नैसर्गिक नसून पूर्णपणे कृत्रिम आहे. याचा परिणाम स्त्रियांच्या स्व-प्रतिमेवर होतो आणि त्या स्वतःला सतत दुसऱ्यांच्या नजरेतून पारखू लागतात.

१०.३ कामगिरीची चिंता: रतिचित्रणाचा लैंगिक आरोग्यावर परिणाम

अनुचित साहित्याचा थेट परिणाम लैंगिक आरोग्यावर आणि कामगिरीवर होतो. अनेक तरुण पुरुषांमध्ये कामगिरीची चिंता (परफॉर्मन्स अँक्झायटी) वाढताना दिसत आहे. पडद्यावर दाखवले जाणारे लैंगिक संबंध हे तासनतास चालणारे आणि पूर्णपणे दिग्दर्शित असतात. बऱ्याचदा काही क्षण क्लिप करून वारंवार रीपीट करून विडियो लांब करण्यात येतो. जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या आयुष्यात तशाच प्रकारच्या कामगिरीची स्वतःकडून अपेक्षा करते, तेव्हा तिला अपयश किंवा दडपण येते. [3]

या मानसिक दडपणामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा अकाली वीर्यपतन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अनुचित साहित्याची सवय लागल्यामुळे मेंदूला तीव्र उत्तेजनाची सवय होते, परिणामी खऱ्या जोडीदारासोबतच्या नैसर्गिक संबंधांमध्ये त्या व्यक्तीला रस वाटत नाही किंवा आनंद मिळत नाही. हे साहित्य लैंगिकतेचा नैसर्गिक ओघ विस्कळीत करते आणि व्यक्तीला एका आभासी जगात ढकलते, जिथे तिला सतत अपयशाची भीती वाटत राहते.

१०.४ वस्तूकरणाचे संकट: इतर व्यक्तींकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे

वस्तूकरण (ऑब्जेक्टिफिकेशन) म्हणजे एखाद्या व्यक्तीला माणूस म्हणून न पाहता केवळ एक वस्तू किंवा साधन म्हणून पाहणे. अनुचित साहित्यात मानवी भावनांना स्थान नसते; तिथे केवळ शरीर आणि उपभोग याला महत्त्व दिले जाते. यामुळे पाहणाऱ्याच्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दलची संवेदना नष्ट होते. जेव्हा आपण एखाद्याला उपभोग्य वस्तू मानतो, तेव्हा आपण त्यांच्या मानवी हक्कांचा आणि सन्मानाचा विचार करणे सोडून देतो.

हे वस्तूकरण केवळ लैंगिक संदर्भातच राहत नाही, तर ते सामाजिक व्यवहारातही झिरपते. यामुळे महिलांवरील छेडछाड, अत्याचार आणि हिंसाचार वाढण्यास मदत होते.[4] जोडीदाराला स्वतःची मालमत्ता समजणे किंवा त्यांच्या इच्छांचा अनादर करणे ही याच मानसिकतेची फळे आहेत. व्यक्तीची ओळख तिच्या विचारांवरून किंवा कर्तृत्वावरून न ठरता केवळ तिच्या शरीरयष्टीवरून ठरवली जाऊ लागते, जे समाजाच्या नैतिक अध:पतनास कारणीभूत ठरते.

१०.५ मानसिक आरोग्याची घसरण: वापर आणि नैराश्य यांच्यातील सहसंबंध

अनुचित साहित्याचे व्यसन आणि मानसिक आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे.[5] सुरुवातीला कुतूहल म्हणून पाहिले जाणारे हे साहित्य हळूहळू व्यसनात रूपांतरित होते. जेव्हा मेंदूला डोपामाइनचा प्रचंड डोस या साहित्यातून मिळतो, तेव्हा साध्या गोष्टींमधील आनंद नाहीसा होतो. हे व्यसन जडल्यानंतर व्यक्तीमध्ये अपराधीपणाची भावना, स्वतःबद्दलची चीड आणि एकाकीपणा वाढतो.

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की अतिप्रमाणात अश्लील साहित्य पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये नैराश्य (डिप्रेशन) आणि तीव्र चिंता (अँक्झायटी) यांचे प्रमाण जास्त असते. सामाजिक जीवनापासून दूर जाणे, कामात लक्ष न लागणे आणि सतत त्याच विचारात राहणे यामुळे मानसिक स्वास्थ बिघडते. हे एक दुष्टचक्र आहे; नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी व्यक्ती पुन्हा त्या साहित्याचा आधार घेते आणि त्यातून अधिकच नैराश्य पदरी पडते.


[1] Damyanti Agarwal, “Indecent Representation Of Women In India”, 2023 IJNRD, Volume 8, Issue 1 January 2023, ISSN: 2456-4184

[2] Erum Hafeez, Fatima Zulfiqar, “How False Social Media Beauty Standards Lead to Body Dysmorphia”, Pakistan Journal of Humanities and Social Sciences, 11(3), 2023

[3] David L. Rowland and Paraskevi-Sofia Kirana, “Atheoretical model for sexual performance anxiety (SPA) and a clinical approach for its remediation (SPA-R)”, Sexual Medicine Reviews, 2025, 13, 184–201

[4] Emma Rooney, “The Effects of Sexual Objectification on Women’s Mental Health”, Applied Psychology Opus, https://wp.nyu.edu/steinhardt-appsych_opus/the-effects-of-sexual-objectification-on-womens-mental-health/, last visited on 10.12.2025

[5] “Breaking the Cycle: Understanding the Link Between Mental Health and Addiction”, mindowl, available at: https://mindowl.org/breaking-the-cycle-understanding-the-link-between-mental-health-and-addiction/, last visited on 10.12.2025

Digital Darkness

Purchase my e-book “Digital Darkness” choose your language.

Instead of doom-scrolling on mobile, just start reading good books. You can opt an option of e-books to save paper.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top